आग्याची नाळ

 शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता मोठ्या उत्साहात आम्ही या साहसी मोहिमेचा श्रीगणेशा केला. नसरापूर येथे सर्व जण जमल्यावर एकलगाव कडे प्रस्थान केले. रात्रीचा घाटातील प्रवासाचा थरार अनुभवत सह्याद्रीच्या देशावरील कुशीमध्ये साधारण मध्यरात्री तीन वाजता येऊन पोचलो.

गाडीतून उतरलो आणि वर निरभ्र आकाशात लाखो चांदण्या नक्षत्रे आणि आकाशगंगा डोळे दिपून पाहिले. या विलक्षण क्षणात दिवसभराचा आणि प्रवासाचा सगळा थकवा नाहीसा झाला. सह्याद्रीच्या माथ्यावरच्या संजीवनी समान थंड स्वच्छ हवेने ट्रेकसाठी अनंत बळ दिले.
मोठ्या मनाच्या कचरे धनगरच्या सारवलेल्या पडवी मध्ये दीड दोन तासाची विश्रांती घेतली. जवळच्या गोठ्यातून गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज ऐकत डोळे कधी मिटले ते कळलंच नाही. शनिवारच्या पहाटे बाहेर बघितलं तेव्हा क्षितिजावर प्रसन्न असं पिवळा केसरी निळा रंगात फुफाटलं होतं. थोड्यावेळाने सर्वांनी फ्रेश होऊन नाश्ता चहा बिस्किट घेतली आणि ट्रॅक्र पॅन्ट शूज घालून आमचा लीडर सागर दादा, रायबा दादा, शुभम च्या सोबतीने चालायला सुरुवात केली.



पाच मिनिटातच सह्याद्रीने खूप विलोभनीय असं दृश्य सादर केले. सकाळच्या कोवळ्या उन्हात दूरचे डोंगर उजळून निघालेले, फोटोजेनिक रेखीव शिखरे, दऱ्यांमध्ये ढग उतरलेले, ढगातून मधूनच निघालेलं टेकडीचं टोक आणि प्रकाशाने उजळलेलं समोरच झाड, एखाद्या स्फटिकाप्रमाणे. पश्चिमेकडे बा रायगड अभेद्य अशी छाती विस्फारुन ऊभा. एरवी धुक्यामध्ये हरवलेलं, पण स्वच्छ दिवस असल्यामुळे दूरवरचे दृश्य दिसू शकले.
जंगलातील प्राचीन अशा देवीच्या जागी आम्ही आरती केली आणि छत्रपती शिवराय व शंभुराजे यांना मानवंदना दिली. कचरे महोदय आणि त्यांच्या कुमाराने इथपर्यंत आम्हाला सोबत दिली. यानंतर अवघड अशा आग्याची नाळ या उतरणीला सुरुवात झाली.

पुर्वी या नाळित मधमाश्यांची मोठाल्ली पोळी होती.. आणि त्यांचा घोंगवणारा नाद.. वातावरण आग डोम्ब.. म्हणून नाव पडले आग्याची नाळ.. कोणी धैर्यवान गावकरी वा मावळा देशावरून कोकणात तास भरात उतरायला या नाळीच्या वाटेचा वापर करत असणार.. मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या रक्त वाहिन्या या सह्याद्रीच्या नाळ वाटा.. या नाळ वाटान्मधुन मूठभर मावळे उतरून शत्रूला कापून पुन्हा आल्या वाटेनी गायब होत असणार..


तीव्र उतार, ओली माती, मोठे दगड, खाच-खळगे, गवत, झुडपे यामधून आम्हा सर्वांना दरीतून खाली एका अज्ञाताकडे चालत राहायचे होते. दोन्ही बाजूस उंच अशा कातळ कडा, झाडे, दूर समोर डोंगराची कडा असे रुद्र पण उत्कंठावर्धक साहसी वातावरण. आम्ही सर्व, निष्णात अशा मार्गदर्शनाखाली आणि मोठ्या धीराने ही कातर वाट उतरत असताना काही सुंदर रांगडया ठिकाणी थांबलो. निव्वळ अभूतपूर्व दृश्ये. सावली आणि आल्हाददायक हवा असल्याने हे संपूच नये असं वाटत होतं. घसरणे, बसणे, उठणे करत अडीच तीन तास सतत उतरणे चालूच होतं. रानफुलं, घेरट्या मारणारे पक्षी, दगड, काठ्या आमचे सोबती झाले.
चिवट झाडाच्या मोठ्या मूळाची दाटी वाटी झालेली .एका झाडाचे मूळ कमानीसारखा झालेलं, त्याच्या खालून पुढे गेलो आणि समोर खळाळणारा स्वच्छ असा झरा. तीन धबधब्यांच्या वाहत्या पाण्याखाली छोट्या तलावात मनसोक्त डुबकी घेतली. या गोड पाण्यात जीव सुखावला, शिण हरपला आणि सूर गवसला. अवर्णनीय अमृततुल्य गोडवा अनुभवला. प्रसन्नता. खूप दुर्मिळ असा विसाव्याचा क्षण अनुभवला. लॉंग शटर एक्सपोजर मध्ये छोट्या धबधब्याचे फोटो काढले.





अल्पोपहारानंतर पुन्हा वाटचाल चालू झाली. आता तीव्र उतार नव्हता, थोड्यावेळाने नदीकिनारीचा सपाट रस्ता पण मोठ्या दगडांवरून टांगा टाकत पाण्यातून उड्या मारत सर केला. काही वन्य पशू ,सर्प, घुबड वगैरे पक्षी दिसतील अशी अपेक्षा फोल ठरली. ते नक्कीच आम्हाला बघून लपून बसले असणार. प्रतीकापुरते घुबडाचे घुकघुक ऐकले, लांडग्याच्या पावलाचे ठसे दिसले. भर दुपारचे असले तरी ऊन त्रासदायक नव्हते. अंगाला कोमट शेकत आम्ही चौदा-पंधरा किलोमीटर चाललो होतो. एनर्जी आणि उत्साह वाढण्यास निसर्गाबरोबरच या ग्रुपची आणि सोन्या सारख्या माणसांची मदत झाली. नाहीतर हे शक्यच नव्हते.






घाटातून उतरून आम्ही खाली कोकणात पोचलो, वाहती हवा बंद झाली आणि दमटपणा जाणवू लागला. दुपारी तीनच्या आसपास रायगड जिल्ह्यातल्या दापोली गावात थोडावेळ विसावा घेतला. जावळी तल्या चंद्रराव मोरेंचे वंशज इथे स्थायिक झालेले आहेत. या छोट्याशा गावात सुद्धा दारू मुबलक पोहोचल्याचे पाहून खूप वाईट वाटले.
आता पुढचा प्रवास वारंगी या ऐतिहासिक गावाकडे जाण्यासाठी चालू केला. मध्ये हे वरदायिनी देवीचा पूल आणि खाली नदीत देवीच्या रूपात पूजले जाणारे मासे बघितले. स्वर्गिय नर्तक या पक्ष्याची मादी दिसली. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेले हे प्रेक्षणीय स्थळ पावसाळ्यात हिरवळीने आणि आणि असंख्य धबधबयांनी स्वर्ग समान दिसत असणार.
शिवरायांच्या इतिहासातल्या गोष्टी, सवंगड्यांचे भटकंती अनुभव ऐकताना रस्ता पार झाला. रायगडाच्या परिघावरून गडाला न्याहाळत असताना त्याच्या भव्यतेची, अभेद्यतेची शक्तीची जाणीव झाली. काही मैल न्याहाळत अंतर कापल्यावर असे वाटले की हा निव्वळ गड नाही ही तर एक भव्यदिव्य वास्तुपुरुष आहे.




सवंगड्यांसोबत चक्क रस्त्यावर पुलावर पाय पसरून बसलो. सूर्य अस्ताला जात असताना संधीप्रकाशात नदीचे, सभोवतालच्या डोंगरांचे रूप डोळ्यात साठवले. वारुंजी गावात आजीबाईंनी आणि मुलांनी प्रेमाने स्वागत केले. विहिरीवर जाऊन मस्त आंघोळ केली. रात्री पंगतीमध्ये जेवणावर ताव मारला. थोड्या शतपावली नंतर सतरंजीवर पडल्या क्षणी झोप लागली. उद्या रविवारी सकाळी रायगड . स्वराज्याची आणि राज्याभिषेकाची ची राजधानी.

Jai Shivraay
November 2019

Comments