बीबटे

 आग्याची नाळ ते रायगड मोहिमेचे शिलेदार यांचं पोस्टर बघितलं.. पावसाळ्यातले नाळीचे युट्युब वरचे रुद्र अवतारातले व्हिडिओ डोळ्यासमोर आले.. तरी पण, नाळीतल्या अवखळ झऱ्यांनी आणि साक्षात महाराजांनी अवतान धाडल्यागत ट्रेकचा निर्धार पक्का केला.. 

याआधी २०१९ च्या हिवाळ्यामध्ये हा ट्रेक केलेला..नाळीतले मोठाले गोटे, धबधबे, सोबत निरंतर वाहणार झऱ्याचं पाणी आणि झुळझुळ आवाज, आजूबाजूला कडेकपारी यातलं असं निव्वळ काव्यात्मक सौंदर्य चित्तामध्ये कायमचं कोरलं गेलेलं.. त्या ओढीनी आपुलकीच्या शिलेदार सोबत पुन्हा नाळीमध्ये उतरलो.. मागच्या अनुभवाने bag हलकी घेतली.. यावेळी वाट अधिक घसरडी, पाणी आधीच्या 20 पट, सौंदर्य आधीपेक्षा वेगळे, पावसाळलेले, तरणे ताठे धबधबे फेसाळलेले, आणि नाळेत 15 km वाहणारे पाणी mini white water rafting ची आठवण करून देणारे.. 




सोबत चे सवंगडी एकापेक्षा एक उत्साही आणि साहसाने भरलेले.. कोणी शेतकरी, कोणी शिक्षक, व्यवसायिक, हॉटेल मालक, युट्युब ब्लोगर, फायनान्स, HR, IT, सरकारी तर कोणी फौजी सुद्धा.. हे अवघे मरहट्टे एका नाळीने बांधले गेले आणि भावासारखे एकवटले.. आणि बिबटे बनून नाळीमध्ये धुमाकूळ घातला, की कपारी तले गरुड, लांडगे लपून सगळ्यांना बघत असतील.. सोबत शिलेदार चे दादा लोक असल्यामुळे सगळे सुखरूप पोहोचणार याबाबत निश्चिंत होते.. 

तीव्र उतारावर गडगडणाऱ्या धोंड्याने आपला निर्जीवपणा सोडून जवळून जात खणखणीत पणे " अरे आवाज कोणाचा?" असा प्रश्न टाकून सगळ्यांना निशब्द केले.. प्रत्येक सवंगड्यांनी आपटून, सटकून, सावधपणे पडण्याची कला आत्मसात केली.. धबधब्यात lagoon मध्ये पोहोण्याचा private pool चा निखळ आनंद सगळ्यांनी लुटला, जगी सर्व सुखी असे झालो.. काहींनी त्यात सूर मारून सुपर एडवेंचर पण केला.. फुल टू एन्जॉय आणि नुस्ती धमाल. कधी झाडांच्या मुळा खालून , कधी पडलेल्या खोडावरून, भर दिवसा अंधारलेल्या झाडांच्या जाळीतून, untouched निसर्गातले काही उत्कट एकरूप झालेले अध्यात्मिक क्षण, कृतज्ञता, सोबतचा फराळ नाश्ता, भर पाण्यामध्ये बेटावर केलेला गरम चहा, मधेच पडणारा पाऊस आणि निष्कारण काढलेले रेनकोट..ट्रेकच्या सुरूवातीचा बुटोबा देव.. कित्येक सुंदर मेमरीज आनंदी मनामध्ये विसावल्या.. 

वारंगी ला जाताना रात्री काजव्यांनी भरलेली झाडेच झाडे, नाळीच्या वाळवंटात दगडा खालची नवजात टिटवीची पिल्ले म्हणजे nat-geo moments.. नाळ संपल्यावर महाड च्या दापोली तून दिसलेला तो भव्य रायगड, अजस्त्र लिंगाणा.. यांनी हिंदवी स्वराज्य कशापासून बनले याची झलक दिली.. त्या युगपुरुष शेर शिवरायां समोर, त्यांच्या दूरदृष्टीसमोर नतमस्तक झालो.. रविवारी रायगडावर महाराजांचे दर्शन घेऊन शिवचैतन्य संचारले.. शिवमय झालो.. रायगड हा साक्षात जिवंत गड पुरुष.. हिरोजी नी बांधलेले पोलादी बुरुज गडा खालूनच दिसले.. प्रेरणा मिळाली.. वाघ बिळातली थंड हवा सुख पाजून गेली.. दोन दिवस चालून थकवा, पाय दुखणं काहीच नाही .. ऊर्जेचा संचार फक्त. 


Flashback - ऑफिसचं काम शुक्रवारी रात्री पर्यंत संपवून स्वारगेटला पोचलेलो.  नव्या सवंगड्यां बरोबर एकलगाव कडे बस निघाली. पहिला स्टॉप - मुंबईकर हायवेला भेटणार म्हणून वारजे ला एका बंद टपरी समोर आम्ही गप्पा ठोकत थांबलो.. तिकडचं कडप्पा टेबल स्वच्छ असल्यामुळे पाठ टेकवली.. resourceful मित्र श्री पोर्टेबल शेगडी वर मस्त चहा बनवीत असताना, चेहऱ्यावरचे smile हे स्नायू काम करायला लागले .. सवंगड्यां बरोबर चहा आणि निखळ हास्यविनोद झाल्यावर एकदमच कुल झालो..  मुंबईकरांना बस मध्ये warm welcome झालं.. नसरापूर फाट्याला सांगलीकर आले, आणि मध्यरात्री टीम पूर्ण झाली.. पुन्हा गणपती बाप्पा मोरया झालं, सात-आठ किलोमीटर नंतर पोलिसांचे लाइट्स आणि सायरन बस पुढे आले. झालं.. यापुढे जर का ट्रिप झाली तर ती 'बोनस' अशी मनाची समजूत केली. आमचे सागर दादा कडक पोलिसांची बोलून पुन्हा आले, बस मागे घेऊन परतणे आता भाग होते. 

सागर दादा आणि सर्व शिलेदारांनी रात्री दोन ला भाटघर मार्गे नियोजन केले.  मी निर्धास्तपणे पुढच्या सीटला बूट टेकवत शरीराचा U करून डोळे मिटले.. शिलेदार रस्ता काढत रात्रभर जागेच होते ..अडीच तीन तासाची मौल्यवान झोप मिळाली. शनिवारी पहाटे पाठल्या अंगाला राजगड-तोरणा ठेवत.. धूक्यातून चालायला लागलो..  तेव्हा, work from home करून वाकलेला पाठीचा कणा हळूहळू उभारायला लागला.. एकलगावची पोरं, म्हातारे, ताया यांचा निरागसपणा भावला.. पोह्यांचा नाश्ता करून सर्वजण अज्ञात दरीमध्ये उतरलो.. नशिबानी पाऊस कमी आणि पाणी जास्तीत जास्त कमरेपर्यंत, आवाक्‍यात लागलं.. शरीराने आणि ताणलेल्या मनाने निवांतपणा ची शिदोरी बांधून घेतली.. 

Jai Shivraay

अमोल सावंत

July 2021

Comments